सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वत: तर नाराज आहोतच, पण महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा दावा केला होता. आता सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
नाशिक : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होते. या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्यानं त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली.
सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु आहेत. सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वत: तर नाराज आहोतच, पण महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा दावा केला होता. शिवाय सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. महत्त्वाचं म्हणजे या पत्रकार परिषदेला उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते. नियोजित कार्यक्रमासाठी नाशिक बाहेर असल्याने सुधाकर बडगुजर पत्रकार परिषदेला गैरहजर राहिले. महानगर प्रमुख विलास शिंदे हे मात्र उपस्थित होते.
महत्त्वाचं म्हणजे सुधाकर बडगुजर यांनी कालच दावा करत, विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण पक्षात नाराज असल्याचा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या पत्रकार परिषदेकडे नाशिकसह राज्याचं लक्ष लागलं आहे.
महानगर प्रमुख विलास शिंदे, खासदार राजभाऊ वाजे, जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी, उपनेते सुनील बागुल, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड उपस्थित होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी नेमकं काय म्हणाले?
काल गिरीश महाजन बडबडले, शिवसेना रहाणार नाही, पण शिवसेनेमुळे भाजप वाढली. तुम्हाला पालकमंत्री देता येत नाही, तुम्ही पक्ष संपवायला निघाले. ही शिवसेना कधीच संपणार नाही, सर्व कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित आहेत. इथे सर्व आहेत हे डबलरोल आहेत का? भाजपने मागील काही दिवसांपूर्वी सलीम कुत्ता प्रकरण बाहेर काढले, मग आता त्यांना मुख्यमंत्री भेट का देतात? नाशिकमध्ये शिबिर झाले, त्यानंतर कसली नाराजी? सुधाकर बडगुजर वैयक्तिक कामासाठी बाहेर आहेत. सुधाकर बडगुजर संभ्रमात आहेत.
दत्ता गायकवाड, माजी जिल्हा प्रमुख
शिवसेनेत नियुक्तीचे निर्णय उद्धव ठाकरे घेतात आणि सामनामधून जाहीर केले जाते. बडगुजर उपनेते झाले तेव्हा कोणाला विचारले होते?
संजय राऊतांचा फोन, बडगुजरांची हकालपट्टी
दरम्यान, ही पत्रकार परिषद सुरु असतानाच संजय राऊत यांचा माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यानं हकालपट्टी केल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टीनंतर पहिली प्रतिक्रिया
पक्षात नाराजी व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही, पक्षाने जी कारवाई केली आहे त्यावर मी योग्य वेळी उत्तर देईन. आज पक्षाने पत्रकार परिषदेचा आयोजन केलं होतं पण मी नाशिक बाहेर असल्याने या पत्रकार परिषदेला गेलो नाही. त्याबाबत मी जिल्हाध्यक्षांना कळवलं होतं. पण मी मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणून जर माझ्यावर कारवाई होत असेल तर ती चुकीची आहे.
पक्षाने कोणाची हकलपट्टी करायची कोणाला पक्षात ठेवायचं हा पक्षाचा निर्णय आहे. त्यावर मी सध्या काहीही बोलू इच्छित नाही मी योग्य वेळी माझी प्रतिक्रिया देईन. माझी पुढची भूमिका काय असेल हे मी वेळ आल्यावर सांगेन. पक्षातून हकालपट्टी होईल अशी कोणतीही कुणकुण लागलेली नव्हती. मी पक्षातील भूमिकांबद्दल नाराजी व्यक्त केली होती मात्र नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा असेल तर ते योग्य नाही.पक्षप्रमुखांनी संधी दिली असती तर भेटलो असतं पण आता हकलपट्टी झाली आहे तर पक्षप्रमुखांचे भेट घेण्याचा प्रश्न नाही. अचानक निर्णय झाला, पक्षाचा निर्णय होता, पक्षाने घेतला. इतर कोण कोण नाराज आहेत त्यांची नावं मी घेणार नाही.
सुधाकर बडगुजर नेमकी काय भूमिका घेणार?
दरम्यान, सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमधील ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते नाराज असल्याचं सांगत, ठाकरे गटाची धाकधूक वाढवली होती. त्यामुळे ठाकरे गट पत्रकार परिषद घेऊन नेमकी काय भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दुसरीकडे सुधाकर बडगुजर हे येत्या काळात कोणती राजकीय भूमिका जाहीर घेणार, याचीही उत्सुकता आहे.
नाशिक
सत्यलेख ·
04-06-2025
·
1:18 PM