परभणी, दि. 4 (जिमाका) : परभणी जिल्ह्यात दिनांक 7 ते 9 जून 2025 या कालावधीत बकरी ईद साजरी केली जाणार आहे. हा सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत (दि.3) केले.
बकरी ईद साजरी करण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 मधील कलम 5 अन्वये गायीची, वळूची किंवा बैलांची कत्तल बकरी ईद निमित्त करण्यात येवू नये. केंद्र शासनाच्या prevention of cruellty to animals rules 2001 मधील नियम 3 अन्वये गर्भधारणा केलेले पशू, 3 महिन्यांपेक्षा कमी वयाचे पशू, सक्षम अधिकाऱ्याने कत्तल योग्य असे प्रमाणिकरन न केलेले पशू यांची कत्तल करण्यात येवू नये. जिल्हा प्रशासनाकडून बकरी ईद निमित्त जे कत्तलखाने तयार करण्यात आले आहेत त्याच ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यात यावी. मोकळ्या जागेत किंवा घरी कत्तल करण्यात येवू नये. कत्तल करण्यात आलेल्या प्राण्यांच्या मांसाची वाहतूक करताना मांस पुर्णपणे झाकलेले असावे. कत्तलखान्याच्या ठिकाणी आयुक्त म.न.पा. परभणी यांनी पाण्याची सोय करावी. तसेच ईदगाह मैदानावर आवश्यक तेवढ्या सोयी उपलब्ध करुन देण्यात याव्यात. उपआयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी/कर्मचारी यांच्या बकरी ईद निमित्त कत्तलखाने व इतर आवश्यक त्या ठिकाणी नियुक्त्या कराव्यात. नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांनी नियुक्ती ठिकाणी हजर राहून दिनांक 07 ते 09 जून 2025 या कालावधीत आपले कर्तव्य पार पाडावे. या बाबत कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी. दिनांक 4 ते 8 जून 2025 या कालावधीत परभणी जिल्ह्यात भरणाऱ्या जनावरांच्या आठवडी बाजारामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची वाहतुक व खरेदी-विक्री करण्यात येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
सत्यलेख ·
04-06-2025
·
5:38 PM